मुंबई : नाशिकच्या सदनिका घोटाळा प्रकरणात दोषी ठरल्यानंतर मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. उच्च रक्तदाबाचा त्रास वाढल्याने सध्या मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल असलेल्या कोकाटे यांच्यावर थोड्याच वेळात अँजिओग्राफी केली जाणार आहे.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कोकाटे यांना नुकतेच अँजिओग्राफीसाठी नेण्यात आले असून, रुग्णालयात सध्या त्यांच्या मुलगी सीमंतिनी कोकाटे आणि पत्नी सीमा कोकाटे उपस्थित आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीकडे राजकीय वर्तुळासह पोलिस प्रशासनाचेही बारकाईने लक्ष लागले आहे.
नाशिक सत्र न्यायालयाच्या निर्णयानंतर माणिकराव कोकाटे यांचा रक्तदाब अचानक वाढला, त्यानंतर त्यांना तातडीने मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून, उच्च रक्तदाब नियंत्रणात येत नसल्याने पुढील काही दिवस वैद्यकीय देखरेखीखाली ठेवणे आवश्यक आहे, अशी माहिती डॉक्टरांनी नाशिक पोलिसांना दिल्याचे समजते. डॉक्टरांच्या प्राथमिक अहवालानुसार, कोकाटे यांना सध्या पूर्ण विश्रांतीची आवश्यकता असून, कोणताही ताण येऊ नये यासाठी विशेष काळजी घेण्यात येत आहे.
आज अँजिओग्राफी, त्यानंतर पुढील निर्णय
दरम्यान, वैद्यकीय अहवाल आणि तज्ज्ञ डॉक्टरांचे मत लक्षात घेता आज सकाळी माणिकराव कोकाटे यांची अँजिओग्राफी होणार आहे. अँजिओग्राफीचा अहवाल आल्यानंतरच त्यांच्या प्रकृतीबाबत पुढील उपचार, डिस्चार्ज किंवा देखरेखीचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. दुसरीकडे, कोकाटे यांच्याविरोधात नॉन-बेलेबल वॉरंट बजावण्याच्या प्रक्रियेबाबतही चर्चा सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, वैद्यकीय परिस्थिती लक्षात घेता वॉरंट थेट रुग्णालयातच दिले जाण्याची शक्यता आहे. नाशिक पोलिसांची टीम लीलावती रुग्णालयात दाखल झाली आहे. आता माणिकराव कोकाटे यांच्यावर कारवाई कधी होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
नाशिक पोलीसांकडून विजय कोकाटेंचा शोध सुरू
दरम्यान, या प्रकरणात माणिकराव कोकाटे यांच्यासह त्यांचे बंधू विजय कोकाटे ( ) यांच्याविरोधातही अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. विजय कोकाटे सध्या कुठे आहेत, याबाबत कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नसल्याने नाशिक पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे.